एक रानमांजराने एक वाघूळ पकडले; तेव्हा त्याने आपणास सोडून देण्याविषयी
रानमांजरास विनंती केली. ती ऐकून मांजर म्हणाले, ‘छे, छे. माझ्या हाती
मिळालेल्या पक्ष्यांस मी कधी जिवंत सोडीत नाही.’ वाघूळ म्हणाले, ‘पण, मी
पक्षी नव्हे, जनावर आहे. माझे तोंड तुला उंदराच्या तोंडासारखे दिसत नाही
काय?’ हे ऐकताच त्या मांजराने त्यास सोडून दिले. पुढे काही दिवसांनी
दुसऱ्या एका रानमांजराच्या हाती ते वाघूळ सापडले. त्या मांजरास
उंदरासंबंधाने मोठी चीड होती. वाघूळ हात जोडून त्यास म्हाणाले, ‘बाबा रे,
मला गरीबाला सोडून दे, मारू नकोस.’ मांजर म्हणाले, ‘तू उंदरासारखा दिसतोस,
तुला मी कधीही सोडणार नाही.’ वाघूळ म्हणाले, ‘दादा, मी उंदीर नाही, पक्षी
आहे. हे माझे पंख पहा.’ ऐकताच त्या रानमांजरानेही त्यास सोडून दिले.
तात्पर्य - आपण दोन्ही बाजूंचे आहो असे भासविणे एखादे वेळी फायदेशीर होते, पण तसे करणे एकंदरीत भयंकर आहे.
Comments
Post a Comment